अफगाणिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद नबी याने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर तो पुन्हा वनडे खेळताना दिसणार नाही. अफगाणिस्तानच्या माजी कर्णधाराने आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
वनडेतील निवृत्तीसंदर्भात नबी म्हणाला की, तशी मी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतरच मनातल्या मनात निवृत्त झाला होतो. पण संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पात्र ठरल्यावर विचार बदलला. या स्पर्धेत खेळून थांबण्याचा निर्णय घेतला आहे, असे तो म्हणाला आहे. मोहम्मद नबी निवृत्ती घेणार असल्याची गोष्ट याआधीच समोर आली होती. आता फक्त अधिकृतरित्या यावर शिक्कामोर्तब झाल्याचे पाहायला मिळाले.
निवृत्तीसंदर्भात काय म्हणाला मोहम्मद नबी?
मोहम्मद नबीनं बांगलादेश विरुद्धच्या दमदार विजयानंतर आपल्या निवृत्तीवर व्यक्त झाला. नबी म्हणाला की, “मी मागील वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मनात निवृत्तीचा निश्चय केला होता. पण त्यानंतर संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला. ही स्पर्धा खेळून निवृत्ती घेणं उत्तम राहिलं, असा विचार करून आधीचा निर्णय बदलला.”
याआधी कसोटी क्रिकेटमधून घेतला होता निवृत्तीचा निर्णय
मोहम्मद नबी हा अफगाणिस्तानच्या संघातील एक वरिष्ठ खेळाडू आहे. त्याने अफगाणिस्तान संघाला मोठे योगदान दिले आहे. अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक विशेष उंची मिळवून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला आहे. नबीनं कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली होती. आता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही त्याने थांबण्याचा निर्णय घेतला आहे.
मोहम्मद नबीची वनडे कारकिर्द
मोहम्मद नबीनं १६५ वनडे सामन्यात २ शतके आणि १७ अर्धशतकांच्या मदतीने आपल्या खात्यात ३५४९ धावा जमा केल्या आहेत. गोलंदाजीत त्याच्या खात्यात १७१ विकेट्सची नोंद आहे. नबीनं २०१३ ते २०१५ या कालावधीत २८ सामन्यात अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व केले आहे.