मनोरंजन

‘पुष्पा २’च्या प्रदर्शनाआधी श्रीवल्लीने अल्लू अर्जुनला दिलं चांदीचं नाणं

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना त्यांच्या आगामी ‘पुष्पा २’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ सिनेमामुळे रश्मिका प्रसिद्धीझोतात आली होती. या सिनेमातील तिने साकारलेली श्रीवल्लीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या सिनेमामधील पुष्पा-श्रीवल्लीची जोडीही हिट ठरली होती. आता पुन्हा एकदा ‘पुष्पा २’मधून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘पुष्पा २’ प्रदर्शित होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. ‘पुष्पा २’च्या प्रदर्शनापूर्वी श्रीवल्लीने पुष्पाला खास भेटवस्तू दिली आहे. रश्मिकाने एक चांदीचं नाणं अल्लू अर्जुनला भेट म्हणून दिलं आहे. याबरोबरच तिने एक खास नोटही लिहिली आहे. “माझी आई असं म्हणते की चांदीचं नाणं भेट म्हणून दिल्याने त्या व्यक्तीच्या आयुष्यात भाग्य लाभतं. हे छोटं चांदीचं नाणं आणि मिठाईमुळे तुझं आयुष्य उजळूदे अशी अपेक्षा करते. तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना दिवाळीच्या शुभेच्छा”, असं तिने लिहिलं आहे. दिवाळीची भेट म्हणून रश्मिकाने हे नाणं अल्लू अर्जुनला दिलं आहे.
अल्लू अर्जुनने याचा फोटो शेअर करत रश्मिकाचे आभार मानले आहेत. “थँक्यू यू…सध्या मला या लकची गरज आहे”, असं अल्लू अर्जुनने म्हटलं आहे.

दरम्यान, ‘पुष्पा २’ सिनेमा देशभरात ५ डिसेंबरला प्रदर्शित केला जाणार आहे. ‘पुष्पा २ : द रूल’ या सिनेमाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं आहे. ४००-५०० कोटींचं बजेट असलेला हा सिनेमा किती कमाई करतो, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. अल्लू अर्जून आणि रश्मिकासोबत या सिनेमात फहाद फासिल, सुनील, अजय, अनुसुया हे कलाकार दिसणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Prove your humanity: 4   +   5   =