मनोरंजन

‘ते गिफ्ट्स कुठून यायचे याची कल्पनाच नव्हती’- जॅकलीन फर्नांडिस

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueliene Fernandez)आणि महाठग सुकेश चंद्रशेखर यांचं प्रकरण तर सर्वश्रुत आहेच. मनी लाँड्रिंगप्रकरणी सुकेश चंद्रशेखर तुरुंगात आहे. मात्र तिथून तो जॅकलीनसाठी अनेक लव्ह लेटर्स पाठवत असतो. यामधून त्याने अनेक खुलासेही केले आहेत. तर जॅकलीन या प्रकरणात तिचा संबंध नसल्याचं दाखवत कोर्टात लढत आहे. दरम्यान आता जॅकलीनने तिला सुकेशकडून मिळणारे गिफ्ट्स नेमके कुठून आणि कसे येतात याची कल्पना नव्हती असा खुलासा केला आहे.

काल बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी मनी लाँड्रिंगप्रकरणी सुनावणी झाली. न्यायमूर्ती अनिश दयाल यांनी शंका विचारली की, “आपल्याला मिळत असलेले गिफ्ट्स कुठून येतात हे जाणून घेणं ही कोणत्याही प्रौढ व्यक्तीची जबाबदारी आहे असं वाटत नाही का? यावर जॅकलीनच्या वकिलांनी उत्तर दिलं.

जॅकलीन फर्नांडिसच्या वकीलाने युक्तिवाद केला. ते म्हणाले, “जॅकलीनला सुकेश चंद्रशेखरकडून तिला मिळत असलेल्या गिफ्ट्सचा स्त्रोतच माहित नव्हता. हे गिफ्ट्स एखाद्या गुन्ह्याच्या पैशांमधून येत आहेत याची तिला कल्पना नव्हती. त्यामुळे ही ईडीची केसही असू शकत नाही. सुकेशबद्दल जे आर्टिकल छापून आलं त्याची खातरजमा न करणं ही जॅकलीनची चूक होती पण ही कायदेशीररित्या चूक नव्हती. तसंच दुसरा आरोपी पिंकी ईरानीने जॅकलीनला हा विश्वास दिला होता की सुकेशचे राजकारण्यांशी संबंध आहेत. इतकंच नाही तर त्याला गृहमंत्रालयातूनही फोन येतात. मात्र नंतर जेव्हा जॅकलीनने सुकेशविरोधातील लेख वाचला तेव्हाच तिने सुकेशशी संबंध तोडले होते.”

याप्रकरणी पुढील सुनावणी २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान जॅकलीन आगामी ‘वेलकम टू जंगल’ सिनेमात दिसणार आहे. यामध्ये अक्षय कुमार, रवीना टंडनसह अनेक कलाकारांची फौज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Prove your humanity: 5   +   3   =