रायगड

सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत

विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंडखोरीचं ग्रहण लागलं असून आता यातून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. सुनील तटकरे यांनी महायुतीशी गद्दारी करण्याचं काम केले आहे असं थोरवेंनी म्हटलं आहे.

कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर सुधाकर घारे यांनी अपक्ष निवडणुकीत अर्ज भरला आहे. मात्र शेवटच्या मुदतीपर्यंत हा अर्ज मागे घेतला नाही त्यामुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, सुनील तटकरेंनी माझ्या कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादीचा अपक्ष उमेदवार उभा केला आहे. महायुती राज्यात सक्षमपणे काम करताना महायुतीचे तिन्हीही नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, पुन्हा राज्यात सत्ता यावी यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. एकएक आमदार आपला निवडून आला पाहिजे हे तिन्ही नेते शर्थीचे प्रयत्न करत असताना सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करत आहेत असा आरोप त्यांनी केला.

कर्जतमध्ये सुनील तटकरेंनी अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना उभं केले आहे. हे पाप सुनील तटकरेंचे आहे. घारे निवडून यावे यासाठी सुनील तटकरे भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना फोन करून सांगत आहेत. त्या कार्यकर्त्यांनी मला ते फोन कॉल दाखवले. अपक्ष उमेदवाराला मदत करा असं तटकरेंकडून सांगण्यात येत आहे. महायुतीत राहून महायुतीशी प्रतारणा करण्याचं काम सुनील तटकरे याठिकाणी करतायेत त्यामुळे मी त्यांचा निषेध करतो असं आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलं आहे.

कर्जत खालापूर मतदारसंघात काय परिस्थिती?

कर्जत मतदारसंघात महायुतीकडून शिंदे सेनेचे महेंद्र थोरवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर मविआकडून ठाकरे सेनेचे नितीन सावंत यांना तिकीट मिळालं आहे. परंतु या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून त्यात राष्ट्रवादीचे बंडखोर सुधाकर घारे हे निवडणुकीत उभे राहिले आहेत. त्यामुळे मतदारसंघात तिरंगी लढतीचं चित्र दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Prove your humanity: 9   +   4   =