चंद्रपूर

भाजप काय आपल्या खिशातून महिलांना १५०० रुपये देते काय ?

भाजप खासदार महाडिक यांनी भर सभेत १५०० रुपये घेऊन काँग्रेसच्या मेळाव्यात जाणाऱ्या महिलांवर लक्ष ठेवा, फोटो काढा सांगितले. इतकेच नाहीतर त्यांची व्यवस्था करतो, अशी धमकी दिली. भाजप काय आपल्या खिशातून राज्यातील महिलांना निधी देत आहे का? लाडक्या बहिणींना भाजपकडून धोका आहे, असे चित्र आहे, म्हणूनच महायुती सरकारला सत्तेतून हाकलून लावा, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

मतदारसंघातील गांगलवाडी येथे रविवारी पार पडलेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला मंहिलांची उत्स्फूर्त गर्दी होती. मेळाव्याला विमुक्त जाती भटक्या जमाती प्रदेशाध्यक्ष पल्लवी रेणके, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समिती सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प. सभापती डॉ. राजेश कांबळे, प्रमोद चिमूरकर, कम्युनिस्ट नेते विनोद झोडगे, जिल्हा उपाध्यक्ष विलास विखार, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, कल्पना गेडाम, मंदा चौके, किशोर राऊत मंचावर उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले, मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पाचे ५ हजार कोटींचे काम आघाडी सरकार असताना सुरू केले. या प्रकल्पाला निधी मिळावा, म्हणून झगडावे लागले. पण, यामुळे संपूर्ण क्षेत्रातील ८० टक्के शेती ओलिताखाली आली आहे. रस्ते, शैक्षणिक घरकूल योजना, दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहे, वाचनालय, गावागावात सामाजिक सभागृहे, शुद्ध पेयजल योजना, क्रीडांगणाचा विकास, आरोग्य व प्रशासकीय सेवेसाठी प्रशस्त इमारती यासाठी आमदार म्हणून कामाचा लेखाजोगा वडेट्टीवार यांनी मांडला. ब्रह्मपुरीमध्ये मी लोकप्रतिनिधी नाही, तर तुमचा भाऊ म्हणून काम करतो, भगिनींच्या पाठीशी वेळोवेळी उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी मार्गदर्शनपर युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या, भाजपकडे टीका करण्यासारखे काहीच नसल्याने खोटे बोलून रडीचा डाव सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Prove your humanity: 10   +   10   =